Tuesday, June 6, 2017

पुस्तकांच्या गावात दिवस..

१९ मे ला रात्री दहाच्या सुमारास मिथुन माने यांचा फोन आला. उद्या भिलारला जायचंय, पुस्तकांच गाव आहे ते. दुसऱ्या दिवशी आमचा मित्र राहुल देवकांत यांच लग्न होत त्यामुळे मिथुनला म्हटल दोनच्या आत साताऱ्यात पोहोचायचं अस नियोजन करू मग जाऊ. 
दुसऱ्या दिवशी मी मनीष, सुजित, रोहित आणि मिथुन सकाळी साडे आठ ला निघालो. रस्त्यात निरंजन फरांदे यांना आनेवाडी येथून सोबत घेतल आणि कुडाळ मार्गे पाचगणीकडे निघालो. रस्त्यात बोरगावला नाश्ता घेतला. नाश्ता आणि इतर सर्व गोष्टींमुळे पोहोचायला उशीरच झाला. १२ वाजले पोहोचायला. आणि मग आम्ही भिलार मध्ये दाखल झालो...
आम्ही सारेच फोटो वेडे पहिल्याच एन्ट्रीला कादंबरीच्या बोर्डपाशी थांबून फोटू काढले. आणि पुन्हा गावात शिरलो. नक्की काय करायचं कुठ जायचं कळत नव्हत. शेवटी त्या सगळ्या प्रकल्पाच कार्यालय सापडलं तिथ त्यांनी एक पत्रक दिल. त्यात सगळी माहिती आणि नकाशा दिला होता. तिथच वर चरित्र आणि आत्मचरित्र सेक्शन होता. तिथ मग वरच्या मजल्यावर गेलो. दोन कपाट भरून पुस्तक दोन टेबल आणि दहा अकरा खुर्च्या आणि पाच सहा माणस तिथ होती. आम्ही गेलो आणि सगळेच पुस्तकांवर तुटून पडलो. पुस्तक वाचून होणे शक्य नव्हते. त्यामुळे चाळायला लागलो काही ओळखीची काही अनोळखी पुस्तक तिथ भेटली. "वारूळ पुराण" मीही जरा चाळल. अरीस्तोटल च चरित्र आणि तत्वज्ञान हे पुस्तक देखील चाळल. तासभर आम्ही तिथेच थांबून पुढे निघालो. गाड्या तिथेच लावल्या नि शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित पुस्तकांकडे वळलो. भिलारे गुरुजी यांच्या घरातच ही पुस्तके होती तीही चाळली सोबत मित्रांशी चर्चा चालू होतीच. पण एवढ असूनही दुसऱ्याच्या घरात आहोत अस वाटतच नव्हत हे ही विशेष. 
मग मोर्चा परिवर्तनाच्या चळवळीच्या पुस्तकांकडे वळवला. सर्वांच्याच आवडीचा विषय होता. सर्वोदय मध्ये काम करणाऱ्या एका जुन्या कार्यकर्त्यांच्या घरातच ही पुस्तके ठेवली होती. त्यांचे चिरंजीव दत्तात्रय भिलारे हे देखील कम्युनिस्ट चळवळीतच काम करतात. तिथेही गप्पा सोबत नवीन पुस्तके त्यांची नावे लिहून घेणे. अभिप्राय नोंदवणे सगळ केल नंतर स्त्री साहित्याचा विभाग चाळला. मग संतसाहित्याकडे आमची वारी निघाली..
रस्त्यात तूतु ची झाड लागली आहाहा!! मग काय वक्ते ऐकतायत होय. तुटून पडली पोर मनसोक्त तूतु खाल्ली. मग निवांत संत साहित्याकडे गेलो. संतसाहित्य हे मंदिरातच ठेवल होत. प्रचंड शांतता आणि मन प्रसन्न करणारा सगळा परिसर.. तिथ मग आम्ही बसलो पुस्तक चाळायला लागलो. पुस्तक चाळताना दोन महिला तिथ आल्या. निरंजन त्यावेळी मा. गो. माळी याचं मौनी बाबा शिवरायांचे खरे गुरु हे पुस्तक चाळत होता. आणि मिथुनला हे शिवरायांचे खरे गुरु बघ अस पुस्तक दाखवत म्हणाला. हे त्या बाईनी ऐकल आणि पुस्तक बघून आमच प्रबोधन करायला सुरुवात केली. हे होय लेखक अशी पुस्तक येतातच अस तुच्छतेने म्हणाल्या. आणि वादाला तोंड फुटलं. शिवरायांचे खरे गुरु कोण? रामदास? असा वाद चालू झाला. त्या महाड हून आलेल्या होत्या. आणि कट्टर उजव्या विचारांच्या असाव्यात. त्यांनी सुनील चिंचोलीकरांचे पुस्तक सांगून यात सगळे पुरावे दिलेले आहेत. बाडांचे क्रमांक दिलेले आहेत अस सांगितल. निरंजनने देखील मा. गो. माळींचे पुस्तकातील सगळे पुरावे दिले. निरंजन प्रचंड संतापला होता. मग नंतर त्यांनी सगळा इतिहास मग त्यात रामदासच कसे गुरु होते. त्यांनी लग्नातून पळून जाणे कसे नैतिक होते वगैरे सांगितल आणि आम्ही अशा विचारांच्या नादी लागू नये असा उपदेश देखील केला. मी त्यांना सुनील चिंचोलीकरांचे पुस्तक दाखवून यात पुरावे दिलेलेच नाहीत अस निदर्शनास आणल. मग त्यांनी दोन तीनदा ते पुस्तक चाळल पण त्यांना पण पुरावे काही सापडलेच नाहीत. मग त्या आपला इमेल देऊन गेल्या. 
आम्ही पण पुस्तक चाळून पुढ निघालो. मग ऐतिहासिक पुस्तक चाळली. एव्हाना प्रचंड भूक लागली होती तरी जाता जाता एक मराठी महाभाषा हा विभाग हॉटेल मध्येच होता तिथे परत पुस्तक चाळली आणि परत निघालो. मग येताना कुडाळ मध्ये प्रशांत यादव या मित्राची गाठ घेतली. त्याच्या घरी सरबत घेतला आणि जेवायला पाचवड मध्ये आलो. तिथ सर्वानीच मटण भाकरी वडली. येता येता निरंजनच्या घरी गेलो. त्याची स्वतःची ५०० पुस्तकांची लायब्ररी पहिली. पुन्हा गप्पा मारल्या आणि सातार्यास परतलो. 
एकूण भिलारची सफर उत्तम झाली. या सर्वात मित्राच्या लग्नाला जाऊ शकलो नाही याचे प्रचंड दुखः आहेच. पण आता असो. भिलार एकूणच भारतातल पहिलं पुस्तकांच गाव आहे. जवळपास १५ हजार पुस्तके इथे ठेवली आहेत. निवांत बसण्याची सोय आहे. विना व्यत्यय वाचण्याची सोय आहे. राहण्याची देखील सोय आहे. एकूण हौशी वाचकांसाठी पर्वणीच आहे. ४० पुस्तकांचा सेट त्यांनी प्रत्येक विभागात ठेवलेला आहे. एकूण २५ विभागात ही पुस्तके विभागून ठेवलेली आहेत. आम्ही त्यापैकी थोड्याच विभागात जाऊ शकलो. एकूणच बाजारी पर्यटनाने गावाला अजून स्पर्श केलेला नाही. परिवर्तन साहित्याच्या विभागात मुलभूत ग्रंथच नाहीत. मात्र तरीही या गावाला भेट द्यावीच शक्य झाल्यास मुक्काम करावा.
एकूणच विनोद तावडे यांचे या उपक्रमासाठी अभिनंदन केलेच पाहिजे. हा उपक्रम त्यांनी चांगल्या ताकदीने राबवला आहे.